सुप्रजा म्हणजे उत्तम संतती जी उत्तम शरीर, उत्तम मन, उत्तम सत्व आणि उत्तम ओज यांनी युक्त असते!! हे सर्व गुण अपत्या मध्ये आई वडिलांकडून गुणसुत्रांद्वारे आणि संस्काराद्वारे येतात. माता- पिता जर आरोग्य संपन्न व स्वस्थ असतील तर संतती ही उत्तम गुणांनी युक्त अशी होते.
अयोग्य आहार विहार, अपथ्य, व्यसनाधिनता, षडरिपूंच्या आहारी जाणे या मुळे जनुकांमध्ये गुणसुत्रीय दोष निर्माण होतात व नंतर अपत्या मध्ये संक्रमित होतात. जसे डाउन सिंड्रोम सारखे जन्मजात व्यंग, काही विशिष्ट आजार (जसे thalassaemia, Huntington’s disease इत्यादि), विशिष्ट प्रकारचे कर्करोग, मनोविकार इत्यादी .
आणि म्हणूनच सुप्रजननासाठी आणि संतती मध्ये उत्तम गुण यावे यासाठी आयुर्वेदाने काही नियमांचे पालन करायला सांगितले आहे. भारतीय संस्कृतीत षोडष संस्कारांचे वर्णन आहेत सांगितले आहेत ज्याचा प्रमुख उद्देश सुप्रजनन हाच आहे.
संस्कार म्हणजे काय तर ज्यामुळे गुण परिवर्तन घडवून आणले जाते ते संस्कार. संस्कारांमुळे विषवल्ली ही अमृता समान काम करणारी होते.संस्कारांमुळे उत्तम गुणांनी युक्त संतती निर्माण होते व हे उत्तम गुण पुढील पिढीत संक्रमित केले जातात. हे संस्कार गर्भधारणेपूर्वी गर्भावस्थेत आणि गर्भाच्या जन्मानंतर करायला सांगितले आहेत. त्यातील सर्वात महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार. योग्य शारीरिक आणि मानसिक परिपक्वता आल्यानंतरच विवाह संस्कार केला जातो ज्याचा मुख्य उद्देश अपत्यप्राप्ती व आपला वंश पुढे चालवणे हाच असतो.
• विवाहानंतर गर्भधारणेची इच्छा होते तेव्हा गर्भाधान संस्कार केला जातो. गर्भाधान संस्कार करण्यापूर्वी गर्भधारणेची इच्छा झाल्यानंतर स्त्री व पुरुष दोघांनीही शरीर शुद्ध करणे आवश्यक असते. पंचकर्माने शरीर शुद्ध होते व शरीरातून दोष निघून जातात आणि स्त्री व पुरुष बीजाची कार्मुकता वाढते.
• शोधनानंतर शरिरात जे सात धातू असतात त्या सर्व धातूंच्या पोषणासाठी व रसापासून शुक्रापर्यंत उत्तम सारवान धातू निर्माण व्हावे यासाठी रसायन औषधांचा वापर केला जातो. प्रमुख रसायन द्रव्यांमध्ये आवळा, हरितकी, शतावरी, यष्टिमधु यासारख्या द्रव्यांचा समावेश होतो.
• यानंतर संतती प्राप्तीच्या इच्छेने विधीपूर्वक शुभ तिथी, नक्षत्र, मुहूर्त पाहून उचित काळी संबंध ठेवल्याने निश्चितच गर्भधारणा होते.
• सुरवातीच्या काही दिवसात गर्भ अतिशय नाजूक असतो म्हणून गर्भ स्थापनेसाठी गर्भ संस्थापक औषधांचा उपयोग करावा ब्राम्ही, शतावरी या औषधांनी सिद्ध तूप किंवा दूध यांनी गर्भ संस्थापित होतो.
• गर्भाचे चांगले पोषण व्हावे यासाठी गर्भावस्थेमध्ये मासानुमासिक गर्भिणी परिचर्येचे पालन करावे . मासानुमासिक गर्भिणी परिचर्ये मध्ये मातेने घ्यायचा आहार-विहार याबद्दलची मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत.
• वैद्यांच्या सल्ल्यानुसार मासानुमासिक गर्भिणी परिचर्येचे पालन गर्भिणी अवस्थेत केल्यास गर्भाची शारिररिक वाढ व बौद्धिक विकास चांगल्या पद्धतीने होतो.
• गर्भावस्थेचे दोन महिने पूर्ण झाल्यानंतर गर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी व इच्छित संतती प्राप्ती साठी पुंसवन संस्कार करण्यास सांगितला आहे. संवन म्हणजे स्पंदन. गर्भाचे पहिले स्पंदन उत्पन्न होण्यापूर्वी जो संस्कार केला जातो तो पुंसंवन.
• आयुर्वेदानुसार गर्भावस्थेच्या पाचव्या महिन्यात मन तर सहाव्या महिन्यात बुद्धीची संपूर्ण अभिव्यक्ती होते आधुनिक विज्ञाना प्रमाणे ही पाचव्या महिन्यात ऑडिटरी व पेरिफेरल सेंसरी रिफ्लेक्सेस डेव्हलप होतात तर पाचव्या महिन्यात मेंदूचा व न्यूरॉन्सचा विकास होतो. या काळात गर्भ बाहेरील आवाज गर्भाशयात ऐकू शकतो.
• गर्भवती स्त्रीला पाचव्या महिन्यात सीमंतोन्नयन संस्कार केला जातो. यावेळी मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक अंकुरित धान्य, हिरव्या वनस्पती, फळांचा व फुलांचा वापर गर्भिणिने करावा या साठीचा हा संस्कार. यात गर्भिणीच्या डोक्यावर उंबराचे कोंब व यवांकूर धारण करायला दिले जातात व आशिर्वचन दिले जातात. गर्भिणीचे मनोबल वाढवले जाते. गर्भिणिला प्रसन्न व मनोनुकुल वातावरणात ठेवले जाते.
• याच काळात गर्भावर मंत्रोच्चार व संगीत याद्वारे संस्कार करणे शक्य आहे. कारण पाचव्या महिन्यात गर्भ बाहेरचे आवाज गर्भाशयात एकू शकतो. सीमंतोन्नयनच्या वेळेसच अभिमन्यूने सुभद्रेच्या पोटात असतानाच चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान श्रीकृष्णा कडून मिळवले होते.
• या सर्व संस्कारात बरोबरच गर्भिणीने आपली परिचर्या योग्य ठेवली पाहिजे. लघु, पथ्यकर व सुपाच्य आहार घेतला पाहिजे.
• गर्भावस्थेत दूध-तूप आणि विशिष्ट औषधांनी सिद्ध यवागू आणि युषांचे सेवन करणं अत्यावश्यक आहे.इतर खनिजांच्या पूर्तीसाठी कॅल्शियम, आयर्न, फॉलिक ऍसिड इत्यादी सप्लीमेंट्स व या घटकांनी परिपूर्ण आहार घेणे आवश्यक असते.
• याच बरोबर योग्य मार्गदर्शनाखाली नियमित योगाभ्यास व व्यायाम करणे, प्रसन्न रहाणे, चांगले संगीत ऐकणे, चांगले साहित्य वाचन यांचाही सकारात्मक परिणाम गर्भाच्या वाढीवर होत असतो व गर्भिणीचे आरोग्य ही चांगले राहते.